आपण आपल्या झोपेविषयी जागरूक आहात का ?

सकाळी तुमचा हात सारखाच snooze बटणावर जातो का?? दिवसभरात कॉफी चहाचे कपावर कप रिजवत आहात का?? दिवसा पेंग येते का?? याचा अर्थ तुमची झोप गाढ होत नाही.

झोप एक मौल्यवान शरीर क्रिया आहे जी निरोगी आयुष्याचा मूलभूत पाया आहे. जेव्हा झोप बिघडते तेव्हा स्वास्थ्य बिघडते व त्यामुळे जीवनाचा दर्जा खालावतो. आपण नेहमीच सात्विक आहार व व्यायाम यावर जोर देत आलो आहे ,जो अर्थात गरजेचा ही आहे .पण यामध्ये झोपेचे महत्त्व मागे राहून गेले .आपण सर्वजण आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग झोपेत घालवतो त्यामुळे तितकेच महत्त्व आपण त्यालाही दिले पाहिजे .जसे खाणे-पिणे तसेच झोप एक मूलभूत गरज आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनास योग कुणासाठी हे सांगताना योग्य आहाराबरोबर  योग्य झोप आवश्यक असल्याचे नमूद केले आहे (६:१६-१७).

चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये देखील झोपेच्या तक्रारी विषयी उल्लेख आढळतो . दक्षिण भारतात असलेली श्रीविष्णूची ‘अनंतासायानाम’ म्हणजेच योग निद्रा या स्वरूपातील आहे . भगवान बुद्धांचे देखील अनेक शिल्प याच मुद्रे मध्ये सापडतात. कोणार्कच्या सूर्यचक्रा मध्ये दिवस आणि रात्रीचे मानवाचे कार्य मुद्रित केलेले आहे. झोपेच्या तक्रारी विषयी आपल्यामध्ये जागरूकता अजून म्हणावी तशी  नाही. जागेपणी एखादे दुखणे झाले तर लगेच आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो तसे झोपेमध्ये होणाऱ्या आजारांच्या बाबतीत होत नाही कारण रुग्णाला स्वतः त्याची लवकर कल्पना येत नाही (अर्थात निद्रानाश अतिझोप हे सोडून ). उदाहरण झोपेमध्ये पायाची हालचाल होणे ,घोरणे ,श्वास अडकणे ,दात चावणे इत्यादी .पण या विकारांचे दुष्परिणाम आपल्याला दिवसा दिसू लागतात ..उलट रात्री पेक्षा जास्त प्रकर्षाने जाणवतात .उदाहरण तांबारलेले डोळे ,वाढलेले वजन ,कामातील रस कमी होणे ,कमी उत्साह ,कमी आनंद जाणवणे ,सकाळी उठल्यावर काम करायला जास्त वेळ लावणे, विसराळूपणा, इत्यादी . याव्यतिरिक्त निद्रा व श्वसनअवरोध (Obstructive sleep apnea) आणि मधुमेह प्रकार 2 यामधील परस्पर संबंध वैद्यकीय दाखल्याने सिद्ध केला आहे .तसेच हृदयरोग होण्याची अथवा वाढण्याची शक्यता वाढते. वर उल्लेखलेले लक्षण सामान्यपणे आढळणार्‍या निद्रा विकारांची आहेत पण अशा प्रकारचे एकूण 84 निद्राविकार आहेत ज्यांचे सात विभागात वर्गीकरण केलेले आहे. निद्रानाश व अति निद्रा हे यामधील दोन विरोधी टोके आहेत. निद्राविकार यांचे परिणाम त्या व्यक्ती पुरत्या मर्यादित रहात नाहीत उदाहरण तीन डिसेंबर 1984 पहाटे ची भोपाळ गॅस दुर्घटना, 1986 चा चेरनोबील अनुभट्टी चा स्फोट रात्री एक वाजता, 2010  मधील सकाळी सहा वाजता झालेली मेंगलोर विमान दुर्घटना तसेच रोजच्या रोज पहाटे रस्त्यावर होणाऱ्या मोटार वाहन अपघात किंवा रेल्वे अपघात हे सर्व कमी किंवा न झोपल्यामुळे झालेले आहेत .हे सर्व नमूद करण्याचे कारण इतकेच की आपल्या देशात अजूनही झोपेच्या अंमलाखाली काम करणे, वाहन चालवणे निषिद्ध किंवा गंभीर मानले जात नाही . परदेशात या विषयी नियम लागू आहेत . या गोष्टींचा विचार करता पुरेशी एकसंघ रात्रीची झोप होणे आवश्यक आहे .तसेच झोपेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये हे महत्त्वाचे.

निद्रानाश (इंसोमनिया ) याचे एक प्रमुख कारण मोबाईल टीव्ही स्क्रीन याचा अतिवापर. या स्क्रीन्स मधून येणारे निळे किरण आपल्या जागेपणी चे बटन चालूच ठेवतात .लॉक डाऊन च्या काळामध्ये मोबाईलचा अतिवापर सर्वांनीच बहुधा अनुभवला असणार आहे. तर मग नेहमी व्यवस्थित गाढ झोप येण्यासाठी काय करता येईल येईल हे पाहू… खाली दिल्याप्रमाणे निद्रास्वास्थ (sleep hygiene) सूचनांचे पालन करून पहा .

१. खूप झोप आली असतानाच बिछान्यावरती जा…लवकर झोप लागेल

 २. बिछान्यावर वर पडल्यानंतर वीस मिनिटाच्या आत झोप येत नसेल तर उठून दुसरीकडे जाऊन अत्यंत कंटाळवाणे काम झोप येईपर्यंत करीत राहा .

३.रोज अगदी सुट्टीच्या दिवशीही ठराविक वेळेला झोपी जा ,सकाळी ठराविक वेळेत बिछान्यातून उठा .

४.नियमित व्यायाम तोही शक्यतो सकाळी करावा. ५.झोपेची खोली अंधारी ठेवा.

६. सकाळी किमान पंधरा मिनिटं सूर्यप्रकाश अंगावर घ्या ज्यामुळे तुमचे जैविक घड्याळ नीट काम करेल.

 या लेखाचा उद्देश आपण आपल्या झोपेविषयी

 जागरूक व्हावे हाच आहे .

गाढ झोपा …जीवन वाढवा!!